मुंबई : सध्या राज्यभरात बार, हॉटेल्स, ग्रंथालय सुरू करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायाम शाळा कधी सुरू होणार? हा प्रश्न व्यायाम शाळा चालवणारे व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पडला आहे. ग्रंथालय सुरू करण्यास वाचन प्रेरणा दिवसाचा मुहूर्त साधला आता व्यायाम शाळांसाठी दसऱ्याचा मुहूर्त नक्की करा, अशी मागणी व्यायाम शाळा मालकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


व्यायाम शाळा सुरू करण्याबाबत सगळी तयारी झाली आहे. याबाबत व्यायाम शाळांच्या मालकांनी एक एसओपी देखील राज्य सरकारकडे सादर केली आहे. त्यामुळे आता तरी सरकार परवानगी देईल आणि राज्यभरातील व्यायामशाळा सुरू होतील म्हणून व्यायामशाळा चालवणारे व्यावसायिक गेली दोन महिने झाले नुसती वाट पाहत आहेत. मात्र, अजूनही राज्य शासनाने कसलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर हात जोडून त्यांना विनंती करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नसल्याचे या व्यायामशाळा चालवणाऱ्या व्यवसायिकांचं म्हणणं आहे.


Mumbai Local Trains : ..तर उद्यापासून मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले!


लाईट बिल, काम करणाऱ्यांचे पगार, व्यायाम शाळांचं भाडं हे सगळं थकलं असुन आता हे भरायला सुद्धा पैसे उरले नसल्याचं व्यायाम शाळांच्या मालकांचा म्हणणं आहे. तर या व्यायाम शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याचे काम करणाऱ्या प्रशिक्षकांचे म्हणणं आहे की आम्ही, जवळ जेवढे पैसे जमा होते ते सगळे पैसे खर्च करून झाल्यानंतर आता आम्ही कर्ज काढून आमचा उदरनिर्वाह करत आहोत. आमच्यातील अनेक मुलं तर सध्या उदरनिर्वाहचं साधन म्हणून डिलिव्हरी बॉयचं काम करत आहेत. त्यामुळे आमच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून आता आम्हाला व्यायाम शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आमचं कुटुंब रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.


याबाबत बोलताना नवी मुंबईतील वाशी परिसरात व्यायामशाळा चालवणारे महेश गायकवाड म्हणाले की, नुकतीच मला माझ्या बिल्डिंगच्या मालकाची मागील 7 महिन्यांचे थकलेले तब्बल 21 लाख रुपये भाडं भरण्यासाठी नोटीस आली आहे. यासोबतच जवळपास 4 लाख 50 हजार रुपये लाईट बिल येऊन पडलं आहे. एकूण सर्व पैशांचा विचार केला तर मला तब्बल 25 लाख रुपये भरायचे आहेत. हे पैसे भरले नाहीत तर लवकरच माझं सर्व कोट्यवधी रुपयांचं साहित्य रस्त्यावर येईल. त्यामुळे आता तरी सरकारने विचार करावा आणि आम्हाला व्यायाम शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. मी माझ्याकडे काम करत असलेल्या 25 कर्मचाऱ्यांना ना पगार देऊ शकलो आहे ना त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकलो आहे. त्यामुळं अनेकजण गावी निघून गेले आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा आणि व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी. याचा फायदा राज्यभरातील हजारो व्यायामशाळा आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखों कर्मचाऱ्यांना होईल.


Gym Owner | वीज बील, भाडं कसं देणार? राज्यात जिमला परवानगी कधी? : जिम मालकांचे सरकारला प्रश्न