मुंबई: नोटबंदीनंतर आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कंत्राटदारांनी नामी शक्कल लढवली आहे. कंत्राटदारांनी पालिकेच्या सफाई कामगारांना पगार हा बँकेत जमा न करता, रोख रकमेच्या त्याही जुन्या नोटांच्या स्वरुपात दिला आहे.
मुंबईच्या मालाड, बोरिवली विभागात काम करणाऱ्या 150 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी आठ-नऊ हजार रुपयांचा पगार जुन्या नोटांच्या स्वरुपात देण्यात आला आहे. पगाराच्या रुपानं 1000 आणि 500 च्या चलनातून बाद झालेल्या नोटा हातात आल्यानं हे सफाई कामगारही गोंधळले आहेत.
विशेष म्हणजे, दरवेळी बँक अथवा चेकच्या स्वरुपात मिळणारा पगार यंदा दोन महिने आधी जुन्या नोटांच्याच रोख रकमेच्या स्वरुपात दिला जाईल, अशी तंबीही मालकांनी दिल्याचं कामगार सांगत आहेत.
एकीकडे भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी कंत्राटदारांना त्यांच्या कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करावे लागतील, असं म्हणलं होतं, पण दुसरीकडे आपला काळा पैसा पांढरा करण्याची नामी शक्कल कंत्राटदारांनी लढवली आहे.
दरम्यान, आरटीजीएस प्रणालीनं हे पगार जर बँक खात्यात जमा न होता रोख स्वरुपात व्हायला लागले तर कंत्राटदार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करु शकतील. तसेच, यामुळे कामगारांच्या सेवाकालावधीचा पुरावा असणाऱ्या पासबुकवरही त्याची योग्य नोंद होणार नाही. त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्याच्या या योजनेत कंत्राटदारांना पालिका अधिकाऱ्यांची फुस असल्याचा आरोप कचरा कामगार श्रमिक संघटनेनं केला आहे.