कल्याण : कल्याणमधील होलीक्रॉस रुग्णालयात 22 वर्षीय रुग्ण दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावरही जमावाने जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलं आहे.


कल्याणजवळच्या वरप गावात राहणाऱ्या रोहित भोईर या तरुणाला काल (रविवार) कल्याणच्या होलीक्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट रुग्णालयात घुसून प्रचंड तोडफोड केली.

याचं घटनेची माहिती मिळताच कल्याणमधील स्थानिक पत्रकार केतन बेटावदकर हे वार्तांकनासाठी घटनास्थळी पोहचले. तेव्हा संतप्त जमावानं त्यांनाही लक्ष्य केलं. यावेळी बेटावदकर यांच्या डोक्यात आणि मांडीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात ते  गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, हल्ला करणारे सर्व हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.