नवी मुंबई : कोपरखैरणे येथील चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी रेहान कुरेशी याला मीरा रोडमधून अटक केली. या नराधमाने 18 गुन्हे केले असून, यामध्ये बलात्कार, हत्या, विनयभंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरेशीने कुर्ल्यातील नेहरुनगर येथे पोलिस वसाहतीमधील चिमुरडीची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी कुरेशीची संपूर्ण कुंडली बाहेर काढल्यावर कुर्ला येथील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. विशेष पोलिस तपास पथक या प्रकरणी तपास करत आहे. देशातील सर्वाधिक लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करणाऱ्या या नराधमाकडून हादरवून टाकणारी माहिती मिळत आहे. अत्याचार झालेल्या पालकांनी पुढाकार घेतल्यास आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत आयुक्त संजय कुमार यांनी दिली.

सुमारे 18 गुन्हे निष्पन्न झाले असून, एकट्या-दुकट्या अल्पवयीन मुलींना गाठून वडिलांनी बोलवले आहे, असे सांगून हा नराधम निर्जनस्थळी त्यांच्यावर अत्याचार करायचा. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींचे वय कमी असल्याने त्याची गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी माहिती झाल्यावर पोलिसांनी त्याची सर्व माहिती गोळा केली. त्याचे वास्तव्य असलेल्या परिसरात आता पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

कफ परेड, कुर्ला या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तपास केल्यावर कुर्ल्यातील लहान मुलीवर अत्याचार करून ठार मारल्याचे उघडकीस आले. 2005 पासून अशा अनेक गुन्ह्यांचा तपास आता पोलिस करीत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोक्सो, विनयभंग, बलात्कार, हत्या गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईमध्ये पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. भोईवाडा, ओशिवरा, गोरेगाव, नेहरुनगर पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.