अमोल यादवांच्या सहा आसनी विमानाची नोंदणी प्रक्रिया सुरु
एबीपी माझा वेब टीम | 01 Nov 2017 11:42 PM (IST)
विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली आहे.
मुंबई : मराठमोळ्या अमोल यादवनं तयार केलेलं विमान लवकरच आकाशात भरारी घेण्याची चिन्हं आहेत. 'एबीपी माझा'च्या पाठपुराव्यानंतर अमोल यादवच्या 6 सीटर एअरक्राफ्टची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली आहे. मुंबईतील चारकोपमधल्या आपल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं सहा आसनी विमान केवळ डीजीसीए (डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन) ची नोंदणी होत नसल्यानं उड्रडाणापासून रखडलं होतं. 2011 म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून अमोल यादव या विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे अमोल यादव यांचं हे विमान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'मेक इन इंडिया वीक'मध्ये दिमाखात दाखवण्यात आलेलं होतं. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंतही हा विषय पोहचवला होता.