मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कारवरील लाल दिवा अवैध असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ताडदेव आरटीओने मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता (वाहतूक) यांना ही नोटीस धाडली आहे.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 1 मे 2017 रोजी काढलेल्या नोटिफिकेशनचा संदर्भ देण्यात आला आहे. लाल दिवे लावण्यास पात्र असणाऱ्या गाड्यांच्या यादीत मुंबईच्या महापौरांच्या गाडीचा समावेश होत नसल्याचं नोटिशीत म्हटलं आहे. त्यामुळे संबंधित लाल दिवा अवैध असल्याचं गेल्या शुक्रवारी बजावलेल्या नोटिशीत नमूद केलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या हाती सत्ता आल्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौरपदाची सूत्रं हाती घेतली.

'ही नोटीस महापौरांच्या इनोव्हा क्रिस्टा या गाडीसंदर्भात आहे. ती महाडेश्वरांनी गेल्या शुक्रवारपासूनच वापरायला सुरुवात केली.' असं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. महापौर कार्यालयाला यासंदर्भात कळवण्यात आलं असून त्याच दिवशी लाल दिवा हटवण्याचं काम होणार होतं, असंही पालिकेतर्फे सांगण्यात आलं.

शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या सहा नगरसेवकांचं पक्षात स्वागत केलं. महाडेश्वरही तिथेच असल्यामुळे त्यांच्या कारवरुन दिवा हटवता आला नाही, मात्र तो झाकला असून वापरला नसल्याचंही पालिकेने स्पष्ट केलं.

या नोटिशीबद्दल कल्पना नसल्याचं विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं. कुठल्या आधारावर ही नोटीस बजावली, ते पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, मुख्यमंत्री यांच्यासह कुठल्याही व्हीआयपींना लाल दिवा वापरता येणार नाही, असं मोदी सरकारने 1 मे 2017 रोजी जाहीर केलं होतं. व्हीआयपी कल्चर मोडित काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.