मुंबई : राज्यात कोरोनाचं संक्रमण वेगाने होत आहे. काल दिवसभरात जवळपास 50 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. त्यामुळे कोरोना संबधीचे नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग याचे पालण करणे गरजेचं आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण. राज्यात कोरोना वाढतोय तसा लसीकरणाचाही वेग वाढत आहे. काल दिवसभरात 4 लाख 62 हजार 735 जणांचं विक्रमी लसीकरण करण्यात आलं आहे. 


काल झालेल्या लसीकरणापैकी 4 लाख 31 हजार 458  लाभार्थ्यांना कोविशिल्ड आणि 31 हजार 277 जणांना कोवॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आलं. काल एकूण 4102 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. आतापर्यंत राज्यात एकूण 73 लाख 47 हजार 429 जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. 



राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने वेग घेतला असून काल 3 एप्रिल रोजी एकाच दिवसात 4 लाख 62 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले.एकाच दिवसात एवढ्या उच्चांकी संख्येने लसीकरण करण्याची देशातील ही पहिलीच वेळ असून त्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला गेला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.

 



राज्यात काल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद


राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे. 


मुंबईतील चार ठिकाणं कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत


मुख्यमंत्र्यांचे आवाहन


कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.