ठाणे : ठाण्यातील रेशनिंग कार्यालयात आज सहायक रेशनिंग नियंत्रण अधिकारी प्रकाश सीताराम परदेशी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यात पत्नी सोडून गेल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचं लिहिलं आहे.
आज बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणेच प्रकाश परदेशी आपल्या कार्यालयात आले. आपल्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी नवीनच विकत आणलेल्या नायलॉनच्या दोरीच्या साहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली.
ठाण्याच्या रेशनिंग कार्यालयातील अधिकारी प्रकाश परदेशी यांची दोन लग्न झाली होती. दुसरी पत्नी सोडून गेल्यानं नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
काय होतं सुसाईड नोटमध्ये?
ठाणे रेशनिंग कार्यालयातील अधिकारी प्रकाश परदेशी यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली आहे, ज्यात "MY WIFE IS MY LIFE" असं त्यांनी लिहिलं आहे, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे. सुसाईड नोटमध्ये ज्या प्रकारचा मजकूर प्रकाश परदेशी यांनी लिहिला आहे त्यातून प्रथमदर्शनी त्यांचं दुसरे लग्न झालं होतं आणि दुसरी पत्नी त्यांना सोडून गेल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या करण्यात आली आहे असं स्थानिक नौपाडा वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं आहे.