Ratan Tata: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल महाराष्ट्रातील एचएसएनसी विद्यापीठाने मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान केली आहे. शनिवारी विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल आणि या विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी रतन टाटा यांना ही पदवी प्रदान केली.


रतन टाटा महान व्यक्ती आहेत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगतातील एक आदर्श नाहीत तर नम्रता, मानवता आणि मूल्यांना प्रोत्साहन देणारे एक महान व्यक्ती आहेत. रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.


रतन टाटा यांनी मानले आभार 


यावेळी रतन टाटा यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाचे आभार मानताना सांगितले की, "हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी."






दरम्यान, रतन नवल टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.