मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करत वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे. रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले गेले होते. शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचेही या काळात फोन टॅप करण्यात आले होते,


साल 2016-17 या कालावधीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अमजद खानच्या नावं सांगून आपला फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक, तत्कालीन भाजप खासदार संजय काकडे आणि इतर निवडून आलेल्या अन्य काही लोकप्रतिनिधींचेही फोन टॅप करण्यात आल्याचंही पटोले यांनी आपल्या आरोपांत म्हटलं होतं. या नव्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाल्यानंतर अखेर फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत वरिष्ठ रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेला हा गुन्हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आला असून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही शुल्का यांनी या याचिकेतून केला आहे. 


फोन टॅपिंग प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत तत्कालीन गृहमंत्री या नात्यानं फडणवीसांच्या भूमिकेचीही यात चौकशी केली जावी, अशी देखील मागणी केली होती. शुक्ला या मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त होत्या. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआरपीएफ (दक्षिण विभाग) च्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha