मुंबई: 'संजय राऊत यांच्या भाषणावर माध्यमांसमोर बोलणार नाही. चार भिंतीत नाही तर खुल्या मैदानात शिवसेनेला उत्तर देऊ.'  असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला  थेट आव्हान दिलं आहे.

 

सत्तेत एकत्र असूनही दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणं सुरुच असतं. 'भाजप सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य आहे.' अशी टीका आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेवर दानवेंनी आपली प्रतिक्रिया दिली.

 

दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'केंद्रात आणि राज्यात निजामांच्या बापाचं राज्य सुरु आहे. ‘अच्छे दिन कुठे गेले?, अच्छे दिन आले असतील तर ते खडसे आणि इतर दोन पाच लोकांनाच आले असतील.'  असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

 

याशिवाय द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या सेलिब्रेशनवरही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. 'मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही सेलिब्रेशन कसलं करता?' असा सवालही त्यांनी विचारला.

 

'तसंच आता निवडणुका घेतल्या तर सरकार आपलंच येईल.' असा दावाही संजय राऊत यांनी केला.