मुंबई : डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं स्टेशन म्हणून ओळखलं जातं. पण डोंबिवलीच्या गर्दीचा हा भार लवकरच कमी होणार आहे आणि याला कारण ठरणार आहे ते म्हणजे नवी डोंबिवली.


डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक आहे. कधी रेल्वेचा खोळंबा झाला की डोंबिवली स्थानकात गर्दीमुळे रेटारेटी, चेंगराचेंगरी ठरलेलीच आहे. याच गर्दीमुळे आत्तापर्यंत अनेक डोंबिवलीकरांनी आपला जीवही गमावला आहे. चार्मी पासद हे त्याचं ताजं उदाहरण आहे. मात्र आता याच गर्दीवर उपाय म्हणून एक नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहे. यामध्ये डोंबिवलीत दोन अतिरिक्त रेल्वे स्थानकं उभारली जाणार असून यामुळे डोंबिवली स्टेशनच्या गर्दीचा भार काहीसा हलका होणार आहे.

पनवेल-वसई-विरार असा हा नवीन रेल्वेमार्ग असून यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. यासाठीच्या 997.88 कोटींच्या खर्चाला नीती आयोगाने मंजुरी दिली असून आता फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मुंबई शहर वाहतूक प्रकल्प म्हणजेच एमयूटीपी 4 प्रकल्पाचा भाग असलेला हा रेल्वेमार्ग 63 किमी लांबीचा असून त्यावर 24 रेल्वे स्थानकं असतील. यापैकी 11 स्थानकं नियोजित असून ती पूर्णपणे नवीन असतील.

सध्याची स्थानकं : पनवेल, कळंबोली, नावडे रोड, तळोजा पांचनंद, निळजे, कोपर, भिवंडी रोड, खारबाव, कामण रोड, जूचंद्र, वसई रोड, नालासोपारा, विरार

नियोजित स्थानकं : नवीन पनवेल, टेंभोडे, पेंधर, निघू, निरवली, नांदीवली, नवी डोंबिवली, पिंपळास, कलवार, डुंगे, पायेगाव

नव्या रेल्वेमार्गामुळे डोंबिवलीहून पश्चिम उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून दादरला वळसा घालून जाण्याऐवजी थेट वसई, नालासोपारा, विरार गाठता येणार आहे. सध्या या मार्गावर चालत असलेल्या मेमू गाड्यांची संख्याही अपुरी असून नव्या रेल्वे स्थानकांच्या निर्मितीमुळे डोंबिवली स्थानकातली गर्दी काहीशी कमी होईल, आणि त्याचा प्रवाशांना फायदा होईल, अशी अपेक्षा प्रवासी आणि प्रवासी संघटना व्यक्त करत आहेत.

नवीन रेल्वेमार्ग तयार होऊन वापरात यायला किमान चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच 'पुढील स्टेशन - नवी डोंबिवली' ही उद्घोषणा लोकलमध्ये ऐकू येईल. तोपर्यंत मात्र डोंबिवलीकरांच्या नशिबी दाराला लटकून प्रवास ठरलेला आहे.