मुंबई : राजीनामे सध्या खिशातून काढून ठेवले आहेत, असं शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत रामदस कदम बोलत होते.
महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या काळात शिवसेनेचे मंत्री कायम आक्रमक असायचे. त्यावेळी, आम्ही मंत्रिपदाचे राजीनामे खिशात ठेवून फिरतो, असे शिवसेनेच्या मंत्री सांगत होते. मात्र, आता सेनेच्या मंत्र्यांनी सपशेल माघार घेतल्याचे दिसून येते आहे.
राजीनामे सध्या आम्ही खिशातून काढून ठेवल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेतच नव्हे, संपूर्ण राज्यात पारदर्शकता आली पाहिजे, असेही रामदास कदम यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असो वा आणखी कुठला, कायम राज्य सरकारला राजीनाम्याची भीती दाखवणाऱ्या शिवसेना मंत्री आता बॅकफूटवर गेले आहेत. दिवाकर रावतेंनी राजीनामा खिशात ठेवून फिरतो, असे म्हटले होते. तेच राजीनामे आता खिशातून काढून ठेवल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
रामदास कदम यांच्या राजीनाम्याबाबतच्या वक्तव्यामुळे शिवसेना आणि सेनेचे मंत्री विरोधकांच्या टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.