मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही जल्लोष केला. यावेळी भगवे फेटे बांधून मिठाई वाटण्यात आली. पण पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी फेटे बांधायला नकार दिला.
मराठा आरक्षणासाठी आंदोलनात 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असताना आम्ही फेटा बांधून जल्लोष करु शकत नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या या दोन बड्या मंत्र्यांनी घेतली आहे. संपूर्ण जल्लोषात या नेत्यांनी फेटे बांधले नाहीत.
मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर
'आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आश्वासन प्रत्यक्षात येत असल्याचं चित्र आहे. कारण विरोधकांनी मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने, कोणत्याही चर्चेशिवाय मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर झालं आहे. विधानसभेत काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी विधेयकाचं स्वागत करत असल्याचं जाहीर करुन पाठिंबा दिला.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक विधानपरिषेदत मांडलं. इथेही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेकाप, शिवसंग्राम पक्षाने विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला. आता हे विधेयक स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षणाचा कायदा लागू होईल.