मुंबई: मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि रिपाइंच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे. उपमहापौरपदाचं आश्वासन मिळाल्यानंतरही रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले अजूनही समाधानी नाहीत सत्ता आल्यास अडीच वर्षे महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद अशी आठवलेंची मागणी केली आहे.
काल रात्री भाजपचे मंत्री विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी रामदास आठवलेंची भेट घेतली. दरम्यान, भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 195 जागा, रासप 5 आणि शिवसंग्रामच्या 4 जागा लढवणार असल्याचं कळतं आहे. मात्र रिपाइं अजूनही 35 जागांची मागणी करत आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज भरण्याची मुदत काल संपल्यानं आता आठवलेंच्या या मागणीवर भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भाजपने 2 फेब्रुवारीलाचा आपल्या 192 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे अवघ्या 35 जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर होतं. काल झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रिपाइंला 25 जागा आणि सत्ता आल्यास उपमहापौरपद देण्याचं जाहीर केलं होतं. याच पत्रकार परिषदेत आठवले यांनी आपल्याला 25 जागा दिल्या असून आपण त्या मान्य केल्याचं म्हटलं होतं. मात्र, काल रात्री पुन्हा एकदा तावडे आणि शेलार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी 35 जागांची मागणी केली. त्यामुळे भाजप आणि रिपाइंचमधील जागांचा तिढा अजूनही कायम आहे.
मुंबई महापालिकेसाठी 40-45 जागा मिळतील अशी आमची अपेक्षा होती. पण त्यांनी 25 जागा दिल्या. त्या आम्ही मान्य केल्या. मुंबईतील ट्रॅफिक, पर्यावरणाच्या काळजीसाठी एकदा महायुतीचा महापौर करुन तर बघा, असं रामदास आठवले कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
मुंबईत भाजप आणि मित्रपक्षाच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित