मुंबई: घरातच राहून नववर्षाचं स्वागत करण्याचा बेत आखणाऱ्यां मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. घरातल्या पार्टीसाठी ऑनलाईन फूडची ऑर्डर देणार असाल तर ती रात्री 9.30 वाजेपर्यंतच द्यावी, रात्री 9.30 वाजेपर्यंतच्या अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय आहार ने घेतला असल्याचं आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगितलंय.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारनं नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा 9.30 पर्यंतच शेवटची ऑर्डर स्विकारण्याचा निर्णय आहारने घेतला आहे.
रात्री 11 नंतरच्या नाईट कर्फ्यूत फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना प्रशासनानं अद्याप कोणतीही सूट दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा उगाच ससेमिरा नको, म्हणून आहारनं हा निर्णय घेतला आहे. आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं की, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पब्ज हे सारं काही रात्री 11 वाजता बंद होईल. मात्र लोकं जर घरी राहून थर्टी फर्स्ट साजरा करणार असतील तर त्यांना पार्सल पोहचवण्यासाठी डिलिव्हरी बॉईजना किमान रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी द्यायला हवी. थर्टी फर्स्टच्या रात्री त्रास नको म्हणून 11 ची डेडलाईन पाळणं आवश्यक आहे. त्यामुळे रात्री 9.30 पर्यंतच पार्सलची शेवटची ऑर्डर स्विकारण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे.
घरात राहून नववर्षाचं स्वागत करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात जशी जेवणाची होम डिलिव्हरी करणाऱ्यांना प्रवासाची सूट होती तशी सूट थर्टी फर्स्टच्या रात्री किमान काही तासांसाठी मिळावी यासाठी आहारचा स्थनिक प्रशासनाकडे सतत संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीय.
आता पालकमंत्र्यांनीच यामध्ये मध्यस्थी करत यावर तातडीनं काहीतरी निर्णय घ्यावा, जेणेकरुन घरात राहून नववर्षाचं स्वागत करणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही आणि हॉटेल व्यावसायिकांचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारची मागणी आहारकडून करण्यात येत आहे. आधीच 2020 मध्ये मोठ्या आर्थिक संकटातून हळूहळू सावरणारे हे व्यावसायिक किमान 2021 चं स्वागत तरी सकारात्मक मानसिकतेनं करतील अशी अपेक्षा आहारतर्फे व्यक्त केली जातेय.
महत्वाच्या बातम्या: