मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यादरम्यान कंट्रोल रूमच्या कॉल रेकॉर्डची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी तक्रार केली आहे. यात घटनेच्यावेळी कंट्रोल रूमचं नियंत्रण करणा-या राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश देण्याच्या राज्य माहिती आयोगानं दिली आहे.

या निर्णयाविरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या प्रकरणात आता राकेश मारिया यांनी देखील आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला अर्ज केला आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद यांनी आयोगाला यावर उत्तर सादर करण्याचे आदेश देत ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता यांनी पोलीस विभागाकडे 26/11 च्या हल्याबाबत पोलीस कंट्रोल रुममधील कॉल रेकॉर्डची माहिती मागविली होती. प्रारंभी हा तपशील देण्यास विभागाने नकार दिला होता. नंतर ही माहिती त्यांना नोव्हेंबर 2009 आणि फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांना विभागून देण्यात आली. मात्र जी कॉल रेकॉर्डची माहिती 26/11 च्या खटल्यात दाखल केलेली आहे आणि जो रेकॉर्ड त्यांना दिलेला आहे, यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे विनिता यांच्या निदर्शनास आले. याची दखल घेऊन आयोगाने मारिया यांच्यावर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा ठपका ठेवला आणि चौकशी आयोग कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले.

आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांनी सन 2014 मध्ये हा आदेश दिला होता. मात्र राज्य सरकारने याविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. आयोगाला असे आदेश देण्याचा अधिकार नाही, एखाद्या प्रकरणात ते फार तर दंड सुनावू शकतात, मात्र चौकशी करण्याचे आदेश देऊ शकत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या याचिकेत आपल्यालाही बाजू मांडायला द्यावी, अशी मागणी मारिया यांनी अर्जाद्वारे केलेली मागणी हायकोर्टानं स्वीकारली आहे. मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्यात अशोक कामटे यांच्यासह हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत.