मुंबई : शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पीटर मुखर्जीचा हत्याकांडाशी संबंध नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मला दिली होती, असं म्हणत राकेश मारियांनी एकप्रकारे आपली दिशाभूल केल्याचं सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सीबीआयच्या तपासात मात्र पीटर मुखर्जींचा या हत्याकांडांशी संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, या हत्याकांडाच्या तपासादरम्यानच मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यांना होमगार्डचे महासंचालक म्हणून पदोन्नतीवर पाठविण्यात आले होते. तरी शीना बोरा हत्याकांड प्रकरणातूनच मारिया यांना आयुक्तपदावरून जावे लागल्याची चर्चा त्या वेळी होती. मुख्यमंत्र्यांनी काल या संदर्भात संकेत दिले.

शीना बोरा हत्याकांड काय आहे?

24 एप्रिल 2012 पासून शीना बोरा बेपत्ता होती. त्यानंतर 24 ऑगस्ट 2015 रोजी अलिबागच्या जंगलात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं आणि धक्कादायक म्हणजे शीनाच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि इद्राणीचा पती पीटर मुखर्जी याला अटक करण्यात आली.