मुंबई : प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022)  भाजपने महाविकास आघाडीला  धक्का दिला खरा मात्र आणखी एक मोठा धक्का महाविकास आघाडीला बसणार होता. आणि तो म्हणजे महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे संजय राऊत यांचा पराभव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. कारण अवघ्या 41 मतांनी अर्थात काठावर संजय राऊत यांचा विजय झालाय. या मतांपैकी एक जरी मत कमी पडलं असतं तर संजय राऊत यांचा पराभव अटळ होता. आणि हाच पराभव शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीला परवडणारा नव्हता. 


भाजपचे विजयी उमेदवार अनिल बोंडे यांचं हे भाकीत खरं ठरलं आणि प्रतिष्ठेच्या लढाईत महाविकास आघाडीला आपला पराभव स्वीकारावा लागला. राज्यसभेची निवडणुकीत भाजपच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने मोठी तयारी केली होती. तसा संख्याबळाचा दावा ही त्यांनी केला. त्यात कुठला ही दगाफटका होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. एवढेच नाही तर महाविकास आघाडी भक्कम आहे म्हणून सगळ्या महाविकास  आघाडीच्या आमदारांना आणि अपक्ष सहयोगी आमदारांना एकत्रित आणून वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत परेड ही करण्यात आली. मात्र महाविकास आघाडीची रणनीती चुकली आणि महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा  पराभव झाला. मात्र हा एकच पराभव नाही तर महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे संजय राऊत यांचा ही पराभव थोडक्यात वाचला.


 महाविकासआघाडी सोबतच अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या  आमदारांना गृहीत धरून महाविकास आघाडीने  तयारी केली. यामध्ये 41 मतांचा कोटा ठरल्याने तीनही उमेदवारांना प्रत्येकी 42 मत देऊन चौथ्या उमेदवाराला ही पहिल्या पसंतीच्या मताने निवडुन आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा होता. मात्र शिवसेनेच्या कोट्यातील सुहास कांदे यांचे मत बाद झाल  आणि संजय राऊत यांना 41 मत पडली. मात्र यात दुस-या पसंतीच एकही मत संजय राऊत यांना नसल्याची माहिती सूत्रांनी दिली  आहे.  दुसऱ्या पसंतीची सर्व मते ही संजय पवार यांना देण्याचा निर्णय महाविकास आघाडीचा होता. त्यामुळे एकही मत बाद झाले असते तर संजय राऊत यांच्याअडचणीत मोठी वाढ झाली असती.


रोज भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या संजय राऊत यांचा पराभव करण्यासाठी भाजपनेर णनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी महाविकास आघाडीचा काय फॉर्म्युला ठरतोय. प्रत्येक उमेदवाराला किती पहिल्या पसंतीची मत देणार यावर भाजप बारकाईने लक्ष ठेऊन होते. एवढंच नाही तर प्रत्येक आमदार कसं मतदान करतोय याकडे ही भाजपचे बारकाईने लक्ष होतं. मात्र संजय राऊत यांचं नशीब बलवत्तर म्हणून दुस-या मताचा काही दगाफटका होऊ शकला नाही.  जर एकही मत बाद झाले असते तर संजय राऊत यांचा पराभव झाला असता. मात्र गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती महाविकास आघाडीची झाली असती.