मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही नेते राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. राज्यसभेसाठी शिवसेना जो उमेदवार देईल त्याला पाठिंबा देऊ, असं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवसेना नेते उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार हजर असणार आहेत.


राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. राज्यसभेतून महाराष्ट्राचे भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम हे सहा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. यात राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे 


कडवट शिवसैनिक संजय पवार
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.


संजय राऊत शिवसेनेचे फायरब्रॅण्ड
शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापासून ते प्रत्येकी वेळी भाजपला अंगावर घेण्याचं काम संजय राऊत निडरपणे करत आहेत. भाजपचा प्रत्येक हल्ला परतावून लावण्याचं काम शिवसेनेकडून संजय राऊत नित्यनियमाने करत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापनेत त्यांचा असलेला वाटा आणि तिन्ही पक्षांमधील वेळोवेळी समन्वयाची गरज ओळखून राऊत त्या त्या वेळी पुढे येतात. राज्यसभेतील शिवसेनेचा चेहरा म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. आतापर्यंत सलग तीन वेळा संजय राऊत यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. आता पुन्हा राऊतांना राज्यसभेवर पाठवून सलग चौथ्यांदा जाण्याचा मान मिळणार आहे.


संभाजीराजे काय करणार?
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आपण राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसभा उमेदवारीसाठी पक्षप्रवेशाची अट शिवसेनेने ठेवली होती. परंतु संभाजीराजेंनी ही अट मान्य केली नाही. त्यामुळे संभाजीराजे अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करणार का हे पाहावं लागेल. 


भाजपकडून सस्पेन्स कायम 
तर राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत मात्र भाजप तिसऱ्या जागेवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपाला 13 मतांची गरज लागणार आहे. तर संभाजी राजेंबद्दलही भाजपकडून सस्पेन्स कायम ठेवला जात आहे.