मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा हा शिवसेनेला असेल, मग शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे असो वा अन्य कुणीही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार आज माध्यमांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 


शरद पवार म्हणाले की, "राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. उरलेली शिल्लक मतं ही आम्ही शिवसेनेला देणार आहोत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला सहकार्य केलं. पुढच्या वेळी राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करावं अशी मागणी त्यावेळी शिवसेनेने केली होती. त्यामुळेच यावेळी आम्ही शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतली. आता शिवसेनेचा सहाव्या जागेसाठी उमेदवार हे संभाजीराजे असो वा अन्य कुणीही, राष्ट्रवादी त्यांना मदत करेल आणि तो उमेदवार निवडून येईल."


संभाजीराजेंना शिवसेनेची ऑफर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून  शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी उघडपणे भाष्य केलं. राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेनं दिलेली ऑफिर स्विकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीने राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. आपली उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती मिळत आहे.