मुंबई: लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघातील जागांचा आढावा घेण्यात येत आहे.
रायगडमधील जागेवरुन या बैठकीत चर्चा झाली. रायगड-रत्नागिरी पट्ट्यात राष्ट्रवादीच्या दोन माजी प्रदेशाध्यक्षांचं (सुनील तटकरे आणि भास्कर जाधव) प्राबल्य आहे. त्यामुळे या जागेच्या चर्चेकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
रायगडमधून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यावर सुनील तटकरे यांनी तात्काळ मी निवडणूक लढवण्यास इच्छूक नाही. भास्कर जाधव यांची इच्छा असेल, तर त्यांना संधी द्यावी आम्ही काम करू असं स्पष्ट केलं.
रायगडमधून भास्कर जाधव यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर जिल्हा पातळीवरुन माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव आलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आता नेमकी कुणालं तिकीट दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची चर्चा करु नका असे आदेश शरद पवार यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातली एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे.
राष्टावादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. त्यात पुण्याची जागा असून तिथून स्वतः शरद पवार उभे राहण्याची शक्यता आहे. 2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.
मुंबई | पार्थ पवार लोकसभा लढणार? वडील अजित पवारांची विशेष मुलाखत
राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे मागितलेल्या जागा
-पुणे,औरंगाबाद, हातकणंगले, जालना
- राजू शेट्टी यांना आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागा देण्यास राष्ट्रवादी तयार
-राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून परभणी आणि अमरावती या जागा बदली करून हव्या आहेत
2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लढलेल्या जागा
- जळगाव
- रावेर
- बुलढाणा
- अमरावती
-भंडारा
-परभणी
-दिंडोरी
-नाशिक
-कल्याण
-ठाणे
-ईशान्य मुंबई
-रायगड
-मावळ
-बारामती
-शिरूर
-अहमदनगर
-बीड
-उस्मानाबाद
-माढा
-सातारा
- कोल्हापूर
याशिवाय मुंबईतही राष्ट्रवादीला एक जागा वाढवून हवी आहे.
- मुंबईतील मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे जिथून गुरुदास कामत यांनी निवडणूक लढवली ती जागा
-किंवा प्रिया दत्त लढवत असलेली मुंबई उत्तर मध्यची जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
या व्यतिरिक्त काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित समजली जातात
ईशान्य मुंबई -संजय दिना-पाटील
ठाणे -संजीव नाईक
रायगड-सुनील तटकरे
बारामती - सुप्रिया सुळे
कोल्हापूर - धनंजय महाडिक,
भंडारा-गोंदिया - प्रफुल्ल पटेल,
नाशिक - छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ,
दिंडोरी - डॉ. भारती पवार,
जळगाव - मनिष जैन,
माढा - विजयसिंह मोहिते-पाटील,
उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील
यांची नावं निश्चित असल्याचं समजतं.
मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या नावाचीही चर्चा आहे.
मात्र सगळ्यात जास्त डोकेदुखी ठरणार आहे ती सातारचा उमेदवार ठरवताना. इथे उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी द्यायची का? याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघांवर दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशा प्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जाणार आहे.
संबंधित बातम्या
मुंबई | पार्थ पवार लोकसभा लढणार? वडील अजित पवारांची विशेष मुलाखत
मावळ लोकसभा मतदारसंघातून पवारांची तिसरी पिढी राजकारणात उतरण्याची शक्यता