राजू शेट्टी यांनी आज नारायण राणे यांची मुंबईत भेट घेतली. माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याच त्यांच्या मनात आहेत का? याबाबत या भेटीत चर्चा झाली. राणेंच्या मनात सुद्धा ईव्हीएम बाबत शंका आहेत. याबाबत जनजागृती आम्ही आता राज्यभर करत आहोत, असे शेट्टी म्हणाले.
येत्या 15 ऑगस्टला आम्ही जागोजागी गावसभा घेणार आहोत. यामध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान करता यावं अशी मागणी केली जाणार आहे. यामध्ये नारायण राणे सुद्धा सहभागी होणार आहेत, असे शेट्टी म्हणाले.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असेल तर लोकशाही टिकविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावं. ईव्हीएममध्ये छेडछाड फक्त ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच करू शकतात, असेही शेट्टी यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करायाचा असेल तर शिवसेना भाजपने मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं. मतदारांमध्ये सुद्धा शंका आहे, असेही ते म्हणाले.
निवडणुकीच्या जागाबद्दल अजून कोणतेही चर्चा झालेली नाही. भाजपचे नेते आम्ही 220 जागा जिंकू, 258 जागा जिंकू, असे खुलेआम बोलत आहेत. जर ईव्हीएमद्वारे जर सत्ताधारी पक्ष या जागा जिंकत असतील तर उरलेल्या जागाबद्दल आम्ही विचार करू, असा टोला शेट्टी यांनी यावेळी लगावला.