मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांचे महानायक रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी ही भेट झाली.


राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज सकाळी लता रजनीकांत यांचं स्वागत केलं. यावेळी राजकारण, समाजकारण, चित्रपट अशा अनेक विषयांवर लता यांनी राज आणि शर्मिला ठाकरेंशी संवाद साधला.

लता रजनीकांत यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती केली आहे. काही चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायनही केलं आहे. 'कोचडाईयन' चित्रपटाच्या हक्कांच्या विक्रीवरुन झालेल्या वादानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.



रजनीकांत यांनी 2017 च्या अखेरीस राजकारणात प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली होती. 2021 मधील तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व 234 जागा लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

रजनीकांत यांनी आपल्या राजकीय पक्षाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. राज आणि लता यांच्या भेटीमागे काही राजकीय धागेदोरे आहेत का, अशा चर्चा रंगल्या आहेत.