Rajesh Tope on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. याला आज (दि.27) राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. यामध्ये मी दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. ते विधानभवनात बोलत होते. 


राजेश टोपे म्हणाले, तिथे समाजातील लोकांना नाष्टा देणे किंवा राहण्याची व्यवस्था आम्ही माणूस म्हणून केली आहे. जरांगे पाटील यांचे आदोलन आजचे नाही. ते अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा आहे. 


 चौकशी झाली तरी हरकत नाही


पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, अशा प्रश्नांवर एसआयटी लावली पाहिजे का? असा प्रश्न मला पडतोय. ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी मी तिथे गेलो होतो. मात्र, जे लोक जखमी झाले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी गेलो होता. माझा तिथे जाण्याचा कोणताही दुसरा हेतू नव्हता. चौकशी झाली तरी हरकत नाही. दुध का दुध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. माझी काम करण्याची पद्धत जनतेला माहिती आहे, असेही टोपे यांनी नमूद केले. 


 तो सहकारी कारखाना आहे, त्यामुळे तिथे लोक थांबायचे


शरद पवार आणि माझा जरांगेंच्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. असली प्रवृती आमची नाही.  तिथून पाच किलोमीटरवर आमचा कारखाना आहे. तो सहकारी कारखाना आहे. त्यामुळे तिथे लोक
थांबायचे. मुख्यमंत्रीही त्यांचे हेलीपॅड तिथेच उतरवत होते. मीडियातील बरेच सहाकारीही तिथेच थांबतात, असेही राजेश टोपे यावेळी बोलताना म्हणाले. 


मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची इच्छा 


आंदोलनाला हिंसक वळण लागावे, असं आम्ही कधीच करणार नाही. अनेक लोक कोणतीही माहिती नसताना बोलत आहेत. आज तिथे प्रत्येक पक्षातील लोक जात आहेत. ते पक्षाचे नाही तर समाजाचे आंदोलन आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची इच्छा आहे. हिंसेला कधी प्रोत्साहन देणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange on Devendra Fadnavis : छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, मनोज जरांगेंचा हल्लाबोल