मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. उर्जित पटेलांच्या राजीनाम्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे."


"विजय मल्ला हा भाजप सरकारचा प्रतिमा रक्षक होऊ शकत नाही. भाजपच्या होऊ घातलेल्या पराभवाचा मल्ला साक्षात्कार आहे", असं राज ठाकरे म्हणाले.


"विजय मल्ल्या भारतात असताना पैसे देण्यास तयार होता. मग त्यावर पळून जायची वेळ कोणी आणली. नीरव मोदी आणि मेहूल चोकसी सारख्या लोकांच काय? त्यामुळे आता काही झालं तरी सरकार आपली प्रतिमा राखू शकणार नाही, असा घणाघात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर केला.


उर्जित पटेलांचा राजीनामा


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे पटेल यांनी सांगितले. रघुराम राजन यांच्यानंतर पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली होती. वैयक्तिक कारणांमुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरुन तात्काळ पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.


विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा


मद्यसम्राट विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाच्या कारवाईला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे थकित कर्जप्रकरणी लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला कोर्टाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.


लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात आज झालेल्या सुनावणीवेळी विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान मल्ल्याला या प्रत्यार्पणाविरोधात अपील करण्यास 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जर हे अपील मान्य करण्यात आलं तर मल्ल्याच्या भारतातील प्रत्यार्पणाला उशीरही होऊ शकतो.


संबंधित बातम्या


मद्यसम्राट विजय मल्ल्याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल पायउतार