मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे स्पष्ट करून उत्तम केलं. पण खालच्या स्थरावर काँग्रेसोबतच्या युत्या आहेत त्याही तोडून टाकाव्यात. काँग्रेससोबत जाणार नाही, पण जम्मू - काश्मीरमध्ये देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी, अफझल गुरुप्रेमी पीडीपीसोबत सत्ता भोगणार हे त्यांना सांगायचंय का? , असा खडा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
काँग्रेस बदमाश असेल, त्यांनी चोऱ्या आणि लफंगेगिरी केलेली आहे म्हणून काँग्रेमुक्त भारताचा नारा दिला आहे. भाजपला जर मेहबुबा मुफ्ती अस्पृश्य नसेल तर त्यांनी काँग्रेसवर टीका करु नये, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
बिहारमध्ये जर भाजपला नितीशकुमारांपेक्षा बऱ्यापैकी जागा मिळाल्या असत्या, तर त्यांनी लालू यादवांशी युती करून सरकार आणलं असतं आणि शुद्धीकरण केलं असतं.
राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण होऊ शकतं, हे आम्ही आता यांच्याकडून शिकत आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
पवारांचा अभ्यास दांडगा
शरद पवारांचा अभ्यास दांडगा आहे, त्यांची वेगळी भूमिका असते. त्यांच्या भूमिकेबाबत त्यांना विचारा. आम्ही भाजपच्या जन्माआधीपासून काँग्रेसशी लढतोय, असं राऊत म्हणाले.
तेव्हा सर्व उत्तरं मिळतील
अविश्वासदर्शक ठरावाबाबत आमच्या भूमिकेकडे जास्त लक्ष देऊ नका. आम्ही सांगून भूमिका पार पाडत नाही. आमच्या भूमिका उत्स्फूर्त असतात. महापौरपदाच्या निवडणुकीपर्यंत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
EVM वर प्रश्नचिन्ह
भाजपच्या जागा वाढल्या, पण वाढलेल्या जागांवरून EVM मशीनने काहूर माजलाय हे पाहताय का? राज्यभरात लोकं कोर्टात चाललेत. याची उत्तरे सुद्धा मिळतील. घोटाळे फक्त पैशांचे किंवा टेंडरचे नसतात तर निवडणुकीत सुद्धा असतात.