मुंबई : गजानन काळे यांच्या पत्नी संजिवनी काळे यांनी आता थेट कृष्णकुंजचे दार ठोठावलं असून आपल्याला आता राज ठाकरेच न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. संजिवनी काळे यांनी आज शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. सोबत त्यांचे वडील आणि रिटा गुप्ता होत्या. संजिवनी काळे यांनी गजानन काळे यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. 


आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा संजिवनी काळे यांनी शर्मिला ठाकरे यांच्यासमोर मांडला. गजानन काळे यांच्या पत्नी संजिवनी काळे, शर्मिला ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्यात कृष्णकुंजवर जवळपास दीड तास चर्चा झाली. राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.


शर्मिला ठाकरे यांची भेट झाल्यानंतर संजिवनी काळे म्हणाल्या की, "आपण आपली व्यथा शर्मिला ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे. त्यांनी माझे सर्व ऐकून घेतलं. राज साहेब आज रात्री येतील, त्यांच्याशी चर्चा करुन मला न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला."


नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंवर त्यांच्या पत्नी संजिवनी काळे यांनी शारीरिक आणि मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन गजानन काळे यांच्याविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार या कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.  


संजिवनी काळे यांचे गंभीर आरोप
गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकाऱ्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी गोळा केले. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत असे पत्नी संजिवनी काळे यांनी सांगितलं होतं. घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणाऱ्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अशा सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संजीवनी यांनी केल्याने गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.


महत्वाच्या बातम्या :