मुंबई : मनसेने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ब्ल्यू प्रिंट दाखवून प्रचार केला होता. तर भाजप 2017 ला गुजरातच्या निवडणुकीत ब्ल्यू फिल्म दाखवून प्रचार करत आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.

राज ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी फेरीवाले, मराठी मुद्दा आणि इतर मुद्द्यांवरही सरकारवर टीका केली. गुजरातमध्ये व्हायरल केलेल्या हार्दिक पटेलच्या सीडीवरुनही त्यांनी भाजपला धारेवर धरलं. शिवाय ज्या राहुल गांधींना भाजपवाले पप्पू म्हणायचे त्या राहुल गांधींचा सामना करण्यासाठी भाजपने फौज उतरवली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

''सरकारला जमलं नाही ते मनसेने केलं''

मुंबई आणि ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईबाबत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. जे काम सरकारचं आहे, ते मनसेने करुन दाखवलं. जे लोकांना आवडलंय. पण तरीही मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले. मनसे कार्यकर्त्याला एक कोटींचं हमीपत्र मागितलं, असं म्हणत राज ठाकरेंनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचाही समाचार घेतला.

सर्व पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने आहेत. 2 हजार कोटी रुपयांचा फेरीवाल्यांकडून सरकारला हफ्ता जातो आणि त्यामुळे ह्यांना त्यांचा पुळका येतोय. मात्र सामान्य माणसाची चिंता कुणालाही नाही. सर्व जण मनसेला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मनसे कधीही एकटी पडणार नाही, कारण महाराष्ट्राची जनता मनसेसोबत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये भाजी विकायला बसण्याचा पहिला अधिकार हा मराठी माणसाचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

''मनसेचं प्रत्येक आंदोलन कायदा मोडणाऱ्यांविरोधात''

मनसेच्या आंदोलनाचा पाढाही राज ठाकरेंनी वाचून दाखवला. शिवाय मनसेकडून आंदोलन अर्ध्यावर सोडून मांडवली केली जाते, असं म्हणणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. मनसेने आंदोलन केलं म्हणून प्रश्न सुटला, असं त्यांनी सांगितलं.

मनसेने आंदोलन केलं म्हणून राज्यातील 64 टोलनाके बंद झाले. विरोधात असताना टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा देणार भाजप पक्ष आज गप्प आहे. मनसेने आंदोलन केलं म्हणून दुकानांवर पाट्या मराठीत लागल्या. दूरसंचार कंपन्यांनाही मनसेने दणका दिला आणि मराठीचा वापर करायला भाग पाडलं, अशा अनेक आंदोलनांची माहिती राज ठाकरेंनी दिली.

दरम्यान दुकानांच्या पाट्या मराठी करण्यासाठी आंदोलन पुन्हा एकदा सुरु करावं लागेल, कारण काही जण अजूनही सुधरलेले नाहीत, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

''बँकांचे व्यवहार मराठीत करा''

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे, की बँकेचा व्यवहार हा संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेनुसारच असावा. मात्र महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही. प्रत्येक राज्यात बँकेचा व्यवहार हा त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये होते, असं राज ठाकरे म्हणाले.

''मूठभर गुजराती लोकांसाठी बुलेट ट्रेन''

बुलेट ट्रेन ही फक्त गुजरातच्या लोकांच्या फायद्याची असल्यानेच त्याला विरोध आहे. मुंबईला त्याचा काहीही फायदा नाही. त्यामुळे देशावर एक लाख कोटींचं कर्ज होणार आहे आणि हे कर्ज प्रत्येक नागरिकाला फेडायचंय, तेही गुजरातच्या लोकांसाठी, असं म्हणत राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनचा विरोध पुन्हा एकदा बोलून दाखवला.

''महाराष्ट्र आपापसातच भांडतोय''

महाराष्ट्र जातीपातींमध्ये गुंतलाय आणि आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात गुंतलोय. ज्याचा फायदा बाहेरुन येणारे घेत आहेत. आज ज्या प्रकारचं षडयंत्र रचलं जात आहे, ते महाराष्ट्रातील माणसाला बेघर करण्याचं आहे. लोकसंख्या वाढत असल्याने या देशाच्या समस्या सुटत नाहीत. पाकिस्तानी आणि बांगलादेशींचे मोहल्ले मुंबई आणि ठाण्यात कसे उभे राहतात? हे असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढे येण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

... तर समृद्धी महामार्ग मध्येच तोडू

नाशिक दौऱ्यावर असताना समृद्धी महामार्ग प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्या महामार्गाने खरंच महाराष्ट्राची समृद्धी होणार असेल, तर ठीक. अन्यथा महामार्ग बांधून वेगळं राज्य निर्माण करण्याचा विचार असेल तर महामार्ग मध्येच तोडू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

विदर्भाच्या विकासाला विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास करावा. मात्र मराठी माणसांना तोडण्याचं, विदर्भ वेगळा करण्याचं षडयंत्र असेल तर ते यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

VIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण