Raj Thackeray on Sammed Shikharji : झारखंडमधील सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करण्यात आल्याने देशभरातून जैन समाजाचा विरोध वाढत चालला आहे. आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून जैन समाज गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray on Sammed Shikharji)जैन समाजाच्या मागणीला पाठिंबा देताना झारखंड सरकारला निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास केंद्र सरकारने त्वरित हालचाल करून निर्णय घ्यावा, अशी मागणी ट्विट करून केली आहे. 


राज ठाकरे ट्विट करून म्हटले आहे की, झारखंडमधील गिरडीह जिल्ह्यातलं 'सम्मेद शिखरस्थळ' हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी. 


महाराष्ट्रातही जैन समाजाकडून मोर्चे आंदोलने


दरम्यान, महाराष्ट्रातील जैन समाज पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. आतापर्यंत मुंबई, दक्षिण मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर, जैन धर्मियांनी मोर्चा काढून झारखंड सरकारला निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरमध्ये जैन समाजाकडून विराट मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून प्रसंगी दिल्लीला धडक देण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे.   


दरम्यान, सम्मेद शिखरजी (history of Sammed ShiKharji) झारखंडमधील गिरडीह जिल्ह्यातील मधुबन भागात आहे. याला पारसनाथ पर्वत असेही म्हणतात. जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्त्व आहे. जैन धर्मातील अनुयायांच्या मते, येथे सुमारे 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाल्याने समेद शिखरजी जैन समाजाला अत्यंत पूजनीय आहे. समेद शिखरजी सुमारे 9 किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. जैन धर्मशास्त्रातील सम्मेद शिखराबाबतच्या मान्यतेनुसार, येथे एकदा तीर्थयात्रा केल्यावर मनुष्याला पशुयोनी आणि मृत्यूनंतर नरक मिळत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे ते पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करू नये. हे श्रद्धेचे क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यास लोक येथे फिरतील. अन्न, दारू इत्यादी निषिद्ध गोष्टींचा वापर होईल, अशी जैन धर्मियांची भावना आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या