मुंबई : मुंबई पोलिसांच्या इतिहासात विशेष पोलीस आयुक्त या पदाची पहिल्यांदाच निर्मिती करण्यात आली असून, भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्य सरकारने बुधवारी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केलेले आयपीएस देवेन भारती आज पदभार स्वीकारण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले. त्यापूर्वी कायदा व सुवव्यस्था विभागाचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.
राज्य शासनाच्या आदेशानुसार यापुढच्या काळात सर्व सहपोलीस आयुक्त विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना रिपोर्ट करतील. आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांंच्यावर पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर भारतींना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात पाठवण्यात आलं. मविआच्या काळात भारतींना साईड पोस्टिंग देण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आलं होतं. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
कोण आहेत देवेन भारती?
1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भारती सुमारे 54 वर्षांचे आहेत. भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा आणि त्यानंतर सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर ते होते. ते राज्यातील पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र ATS चे प्रमुख देखील होते. महाविकास आघाडी सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली करण्यात आली होती.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय
1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. वर्ष 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते