मुंबई : अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या बोट अपघातावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सरकारकडे पैसे नसताना अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
"लोकांचे जीव वाचले ही सगळ्यात सुदैवाची गोष्ट आहे. त्याकरिता परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. सरकारकडे पैसे नसताना अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात. नुसत्या मोठमोठ्या घोषणा करुन लोकांची फसवणूक सुरु आहे", अशी टीका राज ठाकरेंनी केली.
"लोकांच्या तोंडाला फक्त पानं पुसली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता राज्य गहाण ठेवू, असं सांगणारं हे राज्य सरकार ही स्मारकं कशी बांधणार? राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सांगणारा आर्थिक अहवाल आलेलाच आहे. मुख्यमंत्र्यानी आता सरकारचा उरलेला काळ नीट ढकलावा", असा उपरोधिक टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
बोट अपघातात एकाचा मृत्यू
मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला गालबोट लागलं. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सिद्धेश पवार हा विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता होता. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला.
सिद्धेश अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकला होता. सिद्धेश हा व्यवसायाने सीए होता. मूळ कोकणचा रहिवासी असलेला सिद्धेश कुटुंबीयांसह मुंबईत सांताक्रुझ परिसरात राहत होता.