मुंबई : बाहेरून लोक आणले जातात आणि इथला मराठी टक्का कमी केला जातोय, मुंबईत मराठी माणसांना घरे नाकारली जातात, यांची ही हिंमत कसी होते असा प्रश्न राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या मुंबईतील भाषणामध्ये विचारला. हे उत्तर भारतीय लोक आमच्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील लोकांना बाहेरचे लोक म्हणतात, मग हे यूपी, बिहारी मुंबईचे स्थानिक का? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यासाठी ठाकरे बंधूंनी नाशिक, मुंबई आणि ठाणे या तीन ठिकाणी संयुक्त सभा घेतल्या. राज ठाकरे यांनी त्यांच्या तीनही भाषणातून मराठीच्या मुद्द्याला हात घातला. आपले मराठीपण पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मुंबईत वाढणाऱ्या लोंढ्यांविषयी चिंता आणि संताप व्यक्त केला. उत्तर भारतातून हे लोक मुंबईत येतात आणि आमच्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील लोकांना बाहेरचे म्हणतात अशा शब्दात राज ठाकरे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
Raj Thackeray Mumbai Speech : ... मग उत्तर भारतीय स्थानिक का?
राज ठाकरे म्हणाले की, "एका उत्तर भारतीय नेता म्हणाला की मुंबई महापालिकेमध्ये जर नोकऱ्या द्यायच्या असतील तर त्या इथल्या स्थानिक उत्तर भारतीयांना द्या. बाहेरून येणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना देऊ नका. म्हणजे आमचे कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील लोक आता बाहेरचे कधीपासून झाले? आणि हे यूपी, बिहारवाले आतले?"
कृपाशंकर सिंह हा भाजपचा नेता म्हणतोय की मुंबईत उत्तर भारतीय महापौर करू. यांची हिंमत कशी होते असं बोलायची? आपण बोलू शकतो का तिकडे जाऊन? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, "हे लोक असे बोलतात याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे मराठी लोक एकत्र येऊच नये असा बंदोबस्त त्यांनी केलाय. त्यासाठी पैसे देऊन माणसं फोडली जातात. आपले लोक एकत्र येताच कामा नयेत, मराठी माणसं एकत्र येऊच नयेत असा यांचा प्रयत्न आहे. मग यांना पाहिजे ते साध्य करायचा डाव आहे."
बाहेरून लोक येतात आणि वाट्टेल ते बोलतात. मुंबईमध्ये मराठी माणसांना घरे नाकारली जातात? बाहेरुन माणसे आणायची आणि मराठी टक्का कमी करायचा हे प्रयत्न सुरू आहेत असं राज ठाकरे म्हणाले.
ही बातमी वाचा: