मुंबई: माहीमच्या समुद्रातील दर्गा हा अनधिकृत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केल्यानंतर आता त्याची दखल मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. माहीममधील या दर्गाची पाहणी करण्याचे आणि त्यासंबंधी अहवाल देण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांना दिले आहेत. या दर्ग्यावर एका महिन्यात कारवाई केली नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर बांधणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. त्यानंतर माहीम समुद्रकिनाऱ्यावरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 


राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात एक व्हिडीओ दाखवत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा उभारण्यात आल्याचा आरोप केला होता. हा दर्गा जर हटवला नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच हा दर्गा हटवावा असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना केलं.


राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर आता राजकीय तसेच प्रशासकीय चक्रे वेगाने हलू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाने आमदार सदा सरवणकर हे गुरुवारी माहीमच्या समुद्रातील या दर्ग्याची पाहणी करणार आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी माहीम समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे.  


मुंबई पोलिस आयुक्तांनी या अतिरिक्त आयुक्तांना पाहणी करण्याचा आदेश दिले आहेत. हा दर्गा जर अनधिकृत असेल तर त्याची सविस्तर माहिती मुंबई महापालिका आयुक्तांना देण्यात येईल. त्यानंतर महापालिका आयुक्त यावर कारवाई करतील अशी माहिती आहे.


ते बांधकाम आमच्या हद्दीत नाही, महापालिकेचं स्पष्टीकरण


समुद्रातील आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील. मुंबई महापालिका कायद्यानुसार मुंबई महापालिकेची हद्द किनाऱ्यापलग असल्याने समुद्र जिथे सुरू होतो त्या समुद्राच्या आतील भागात महापालिका कारवाई करू शकत नाही. तरीसुद्धा मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील.


Raj Thackeray on Mahim Dargah : काय म्हणाले होते राज ठाकरे? 


माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिलं. 


ही बातमी वाचा: