Continues below advertisement

मुंबई : मराठी माणसाच्या अस्मितेवर हल्ला करणाऱ्या भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांनी संसदेच्या परिसरात हिसका दाखवला. त्यावरून राज ठाकरेंनी या खासदारांचे कौतुक केलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात निशिकांत दुबे बोलत असताना काँग्रेस खासदारांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यापुढे सर्व वैचारिक मतभेद हे क्षुद्र आहेत. महाराष्ट्रासाठी तुमचा आवाज नेहमीच संसदेत बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यावरुन मुंबईच्या वर्षा गायकवाड, चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर आणि धुळ्याच्या शोभा बच्छाव या खासदारांनी संसदेच्या लॉबीमध्ये निशिकांत दुबेंना गाठलं. या खासदारांनी निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रद्वेषी वक्तव्यांचा जाब विचारला. त्यावरुन राज ठाकरे यांनी या खासदारांचे कौतुक केलं आहे.

Raj Thackeray Letter To Varsha Gaikwad : राज ठाकरेंचे वर्षा गायकवाडांना लिहिलेलं पत्र :

प्रति,

खासदार वर्षाताई गायकवाड,

सस्नेह जय महाराष्ट्र!

मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल बरंच मनापासून आभार.

महाराष्ट्राला सध्या 'व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उभाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरे आहे कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्य आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे.

यामुळेच सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या, आणि 1857 चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणाऱ्यात मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार.

महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का बसले माहित नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत !

तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

आपला नम्र,

राज ठाकरे