Raj Thackeray Health Updates : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला. यामागे त्यांच्या प्रकृतीचं कारण सांगितलं जात होतं. आज त्यांनी स्वत: आपल्या प्रकृतीसंदर्भात अपडेट दिलं. त्यांचं 1 जून रोजी ऑपरेशन होणार आहे. याबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, येत्या 1 तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं, असं म्हणत राज ठाकरेंनी टोला लगावला, ज्यानंतर सर्वत्र हशा पिकला.
राज ठाकरे म्हणाले की, पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन-चार आठवडे रिकव्हरीसाठी जाईल. त्यानंतर महिना-दोन महिन्यांनी पुन्हा तुमच्यासमोर येईन. तूर्तास हे आंदोलन चालू ठेवायचं आहे. त्यासाठीचं पत्र सर्व हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ज्यांना मनसेचे हिंदुत्व, भोंगा आंदोलन खुपले, ते सर्व एकत्र आले. सर्व ढोंगी आहेत, त्यांचे हिंदुत्व म्हणजे नुसती पकपक आहे. आम्ही रिझल्टस् देतो, आमचे हिंदुत्व रिझल्टस देणारे, आम्ही मराठी जनतेला रिझल्टस् देतो! मनसेची आंदोलने होतील, होतच राहतील, वकिलांची टीम तयार आहे! भोंगा आंदोलन सुरूच राहील. शस्त्रक्रियेनंतर, विश्रांती घेऊन दीड-दोन महिन्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
अयोध्या दौरा स्थगित का केला? राज ठाकरेंनी थेट सांगितलं
अयोध्या दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की,अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. ऐन निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या सभेच्या अन्य महत्वाच्या बातम्या