मुंबई : आज मध्यरात्रीपासून बेस्टच्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून बेमुदत बंद पुकारला आहे. पण बेस्ट कामगार कृती समितीमध्ये मात्र फूट पडली आहे. या संपात शिवसेनेची बेस्ट कामगार संघटना सहभागी होणार नाही. तर भाजप बेस्ट कामगार संघटनाही आज संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय घेणार आहे.

बेस्टची वाटचाल खाजगीकरणाकडे चालल्याच्या विरोधात हा बंद पुकारण्यात येणार आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या मार्गांवर भाडेतत्वावरील ४५० खाजगी मिनी बसेसना मुंबईभरात चालवण्यासाठी बेस्ट समितीनं नुकतीच परवानगी दिली आहे.

मात्र, बेस्टला खासगीकरणाकडे नेणाऱ्या या निर्णयाला शशांक राव यांच्या बेस्ट युनियन समितीनं विरोध केला आहे. हळूहळू बेस्ट संपवण्याचा घाट घातला जातोय असं संघटनेचं म्हणणं आहे.

याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिलेल्या दिवाळी बोनसचे हप्ते त्यांच्याकडूनच वसूल करत प्रशासनानं बेस्ट कामगारांना वेठीस धरलं जात आहे. असं या संघटनांचं म्हणणं आहे.

या सर्व गोष्टींविरोधात आज मध्यरात्रीपासून बेस्टचे जवळपास ३५ हजार कामगांर संपावर जाणार आहेत.

बेस्ट संपाबाबत बेस्ट भवनमध्ये 3.30 वाजता बैठक होणार आहे. यासाठी बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी युनियन प्रमुखांना बैठकीला बोलावले आहे. यावेळी बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.