मुंबई :  तुम्ही मालक आहात आणि बाकीचे आलेले भाडेकरू आहेत हे लक्षात ठेवा. तुमचा हक्क घालवू नका असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले. अभिमानाने ताठ मानेने येथे राहिले पाहिजे, असे राज यांनी म्हटले. स्थानिक मराठी-परप्रांतीय, मराठी पाट्या आणि मांसाहारी-शाकाहारीच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू असताना राज ठाकरे यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. 


मनसेकडून लालबाग-परळ (Lalbaug Parel) येथे कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. आज महोत्सवाचा तिसरा दिवस होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी म्हटले की,  मी लहानपणापासून इथे अनेकदा यायचो. आज सुद्धा तसाच मटणाचा सुगंध आला. हे असले जत्रोत्सव हे मराठी माणसाचे अस्तित्व आहे. बाहेरून कितीही आले तरीही तुमचे हे रक्त मराठी भागात असेच सळसळते राहिले पाहिजे. तुम्ही मालक आहात आणि बाकीचे आलेले भाडेकरू आहेत हे लक्षात ठेवा. तुमचा हक्क घालवू नका. अभिमानाने ताठ मानेने येथे राहिले पाहिजे. तुमच्या तक्रारी तिथून झाल्या पाहिजेत की हे आम्हाला त्रास देतात असेही राज ठाकरे यांनी म्हटले. लालबाग परळ शिवडी हा भाग माझ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर आजही जातो आहे. हे सर्व तुम्ही जपावे, असे आवाहन राज यांनी यावेळी केले. 


चार-पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आपल्यासमोर आलेला आहे. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. या ढोल ताशांच्या आवाजापेक्षा माझा ढोल जोरात वाजणार आहे. काही जणांना माझ्या ढोल ताशाच्या आवाजाचा त्रास होईल असे म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार उतरवणार असल्याचे संकेत दिले. 


मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक 


सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानिक भाषेत करावेत, असे आदेश दिले होते. त्याची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मुंबईतील अनेक परिसरातील इंग्रजी पाट्या हटवून मराठी पाट्या लावण्यात आल्या. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सगळ्यांना आवाहन केलं. त्यानंतर ज्या ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसल्या त्याठिकाणी आंदोलन झाले. काही ठिकाणी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेनेदेखील मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाई सुरू केली आहे.