मुंबई : एके काळी चांगले मित्र असलेले महाराष्ट्रातले दोन नेते आता मात्र 'राजकीय वैरी' झाल्याचं दिसत आहे. एक आहेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, तर दुसरे आहेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातला रुसवा लपून राहिला नाही. एकाच सोहळ्याला दोघं उपस्थित राहिले, मात्र त्यांनी एकमेकांकडे पाहिलंही नसल्याचं कॅमेराच्या नजरेतून सुटलं नाही.


ख्यातनाम चित्रकार, प्राध्यापक प्रल्हाद धोंड यांच्या 'धवलरेषा' पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राज ठाकरे आणि शेलार उपस्थित राहिले होते.
पुस्तक आणि धोंड यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते झालं. मात्र यावेळी राज आणि शेलार ना एकमेकांशी बोलले, ना त्यांनी एकमेकांकडे पाहिलं.



यापूर्वीही शेलार यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर शरसंधान साधलं होतं. शरद पवारांची बाजू घेतल्याबद्दल "शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे" अशा शब्दात आशिष शेलारांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता.

'सोडून गेले नगरसेवक...सोडून गेले आमदार...एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी "फक्त लढ" असे म्‍हटले.!! "शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे" असं ट्वीटही आशिष शेलार यांनी केलं होतं.

पुस्तक प्रकाशनानंतर राज ठाकरे यांनी प्रल्हाद धोंड यांच्यासोबत घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरेंनी जुन्या कलानगरमधील आठवणी सांगताना आपल्या जुन्या मित्रमैत्रिणी, स्नेही यांची भेटही घेतली.