ठाण्यातील दिव्यात राज ठाकरेंची प्रचार सभा झाली. उत्तर भारतीयांच्या मतांसाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गोंजारलं जातंय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही समाचार घेतला.
''ठाणे जिल्हा हा भारतातला एकमेव जिल्हा आहे ज्याची लोकसंख्या वेगाने वाढतीये आणि ती देखील बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळें,
मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात, का तर उत्तर भारतीय मतं आहेत म्हणून त्यांना जपणार.
ठाणे हा या देशातला एकमेव जिल्हा आहे, ज्यात 7 महानगरपालिका आहेत,
कारण काय तर वाढलेली लोकसंख्या आणि ही लोकसंख्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे वाढलीये''
राज ठाकरे
''मुख्यमंत्र्यांना 'तो' अधिकार नाही''
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना हे आश्वासनं कशाच्या आधारावर देत आहेत?, असा सवालही राज ठाकरेंनी केला.
''भाजपच्या होर्डिंगवर मुख्यमंत्री सांगतात 'हा माझा शब्द',
स्वत:च्या हिंमतीवर खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यावा,
बसवलेल्या माणसाने शब्द देऊ नये,
मोदींनी उद्या दुसरा माणूस बसवला तर तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय?''
राज ठाकरे
कल्याण-डोंबिवली महापालिकेला 6 हजार 500 कोटींचं आश्वासन दिलं, पण आजपर्यंत साडेसहा रुपये पण नाही दिले, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाण्यातील चारही पक्ष एकत्र बसतात आणि यांचे नेते बिल्डर आहेत, यांची सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकामं आहेत आणि टांगती तलवार जनतेच्या डोक्यावर आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
आयुक्त सांगतात डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न 3 महिन्यात सोडवतो आणि मुख्यमंत्री म्हणतात 1 वर्ष लागेल, मुख्यमंत्र्यांना नेमकी अडचण काय आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
''शिवसेना-भाजपने 25 वर्षात फक्त अनधिकृत बांधकामं वाढवली''
दिव्यात गाडीकरता सोडा, साधा बैलगाडीसाठी पण रस्ता नाहीये, तरीही सेना भाजपला याचं काहीच वाटत नाही. दिव्यात इथे काही लहान मुलं आत्ता भेटून गेली, ते म्हणाले अभ्यास करताना सारखे लाईट जातात, पण याचं कोणालाच काहीच कसं वाटत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
25 वर्ष शिवसेना-भाजपच्या हातात ठाण्याची सत्ता आहे, पण यांनी केलं काय तर अनधिकृत बांधकामं वाढवली, त्याची टांगती तलवार आज जनतेच्या डोक्यावर आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
त्याच त्याच लोकांना जर तुम्ही निवडून देणार असाल तर मग अनधिकृत बांधकामं ,डम्पिंग ग्राऊंड याच्या तक्रारी करू नका, असंही राज ठाकरे म्हणाले.
''दिव्यातील काही भागातील रहिवासी ट्रेनने मुंब्र्याला जाऊन पाणी आणतात.
काय भीषण परिस्थिती आहे ही,
वीज, रस्ते, पाणी यांसारख्या सुविधा तुम्हाला वर्षानुवर्षे मिळत नसतील
तरीही तुम्ही प्रश्न विचारणार नाही?''
राज ठाकरे
''बाळासाहेबांच्या फोटोआड भ्रष्टाचार दडवू नका''
शिवसेनेने होर्डिंगवर बाळासाहेबांचे फोटो लावले आहेत आणि 'बोलतो ते करुन दाखवतो', अशी टॅग लाईन दिली आहे. पण बाळासाहेब बोलायचे ते करायचे, तो अधिकार शिवसेनेला नाही, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
मुंबई, ठाण्यात शिवसेनेने जो पैसा खाल्लाय, तुमचा गलथान कारभार, बाळासाहेबांच्या फोटोआड दडवू नका, असंही राज ठाकरेंनी ठणकावलं.
''नोटाबंदीनंतरही भाजपकडेच पैसा''
नोटाबंदीमुळे एक कोटींच्यावर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाचं वाटोळं केलं पण भाजपकडे निवडणुकीच्या वेळेला कुठून पैसे येतो?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
''भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं,
विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पक्षाने उमेदवाराची इच्छा नसताना
प्रत्येकी 1 कोटी दिले होते,
म्हणजे 288 कोटी 288 उमेदवारांकरता, एवढे पैसे आले कुठून?''
राज ठाकरे
''शिवसेना-भाजप सत्तेकरता लाचार''
शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही फरक नाही. एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं, अशी परिस्थिती आहे. दोघंही भ्रष्टाचारी आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी
''शिवसेना-भाजप सत्तेकरता लाचार आहेत,
निवडणुकीला भांड-भांडले आणि नंतर पुन्हा सत्तेत मांडीला मांडी लावून बसले,
अशी परिस्थिती आहे'',
राज ठाकरे
पाहा संपूर्ण भाषण :
महत्वाचे मुद्दे :
मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात, परप्रांतियांना एवढं का गोंजारता? : राज ठाकरे
बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांमुळे ठाण्याची संख्या रोज वाढतीये : राज ठाकरे
ठाण्यात सगळे पक्ष एकत्र बसतात, सगळ्या पक्षांचे नेते बिल्डर आहेत : राज ठाकरे
स्वतःच्या हिंमतीवर बसलेल्या माणसाने शब्द द्यायचा असतो, मुख्यमंत्र्यांना तो अधिकार नाही : राज ठाकरे
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत 6500 कोटी देण्याचं आश्वासन दिलं होतं, काहीच दिलं नाही : राज ठाकरे
कुणीही येतं आकडे सांगतं, त्यालाच भुलून मतदान केलं जातं : राज ठाकरे
ठाण्यात गाडी सोडा, बैलगाडीसारखाही रस्ता नाही : राज ठाकरे
25 वर्ष शिवसेना-भाजपच्या हातात ठाण्याची सत्ता आहे, पण यांनी फक्त अनधिकृत बांधकामं वाढवली : राज ठाकरे
प्रकरण फसलंय हे समजलं म्हणून मोदींनी नोटाबंदीवर बोलणंच बंद केलं : राज ठाकरे
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना हे आश्वासनं कशाच्या आधारावर देत आहेत: राज ठाकरे
करायचं ठरवलं तर सगळं शक्य आहे, पण यांची ईच्छाच नाही : राज ठाकरे
जे काहीच करु शकत नाहीत, त्यांच्याचकडे पुन्हा सत्ता दिली तर तक्रार कुणाकडे करणार? : राज ठाकरे