मुंबई : काल थोडीशी उसंत घेणाऱ्या पावसाने आज मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईतील दादर, परळ आणि वरळीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, तर बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वांद्र्यासह ठाणे कल्याण-डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.

 

पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम

 

मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे वाहतूककोंडीच्या समस्येनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातच रस्त्यांवर खड्ड्यांची भर आहे. त्यामुळे मुलुंड टोलनाका ते कांजूर, मुलुंड ते घाटकोपर, एलबीएस रोड, जेव्हीएलआर रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

 

रेल्वे वाहतूकही उशीरने

 

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वे – 15-20 मिनिटं, हार्बर रेल्वे –  10-15 मिनिटं, तर ट्रान्सहार्बर – 10-15 मिनिटं उशिराने सुरु आहे.