कल्याण : सहा महिन्यांपासून पगार न दिल्याने रेल्वेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या उद्घोषकाने काल (30 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. व्यंकटेश वेणूगंटी असे या तरुणाचे नाव असून तो उल्हासनगरमध्ये राहतो. सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले आहे. सध्या त्याच्यावर उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
"मी पगारासाठी इतक्या दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र प्रत्येक वेळी मला उडवून लावण्यात आलं. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं," असं व्यंकटेश वेणूगंटी याने सांगितलं.
या घटनेनंतर व्यंकटेशच नव्हे तर रेल्वे स्थानकावर कंत्राटी पद्धतीने अनाऊन्समेंटचे काम करणाऱ्या सुमारे 200 ते 250 जणांना अनेक महिन्यापासून पगार मिळत नसल्याचे समोर आलं आहे. व्यंकटेशबाबत माहिती मिळताच या कर्मचाऱ्यांनी उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात धाव घेतली आणि तात्काळ काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित ठेकेदार आम्हाला कोणत्याही सुट्ट्या देत नाही, पगार वेळेवर सोडाच पण चार महिन्यांपासून पगार दिलेला नाही, असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसंच याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केली मात्र अद्याप त्यांनी देखील प्रतिसाद दिलेला नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी केली. शिवाय आज कर्जत, कसारा ते सीएसटी दरम्यान असलेल्या कंत्राटी अनाऊन्समेंट कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याचे सांगितलं.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : मनसे
दरम्यान मनसे आणि प्रहार कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज व्यंकटेश वेणूगंटीची भेट घेऊन विचारपूस केली. तसंच वस्तुस्थिती जाणून घेतली. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न रेल्वेने निकाली काढावा आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी रेल्वेकडे करणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आणि काही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यानंतर आता तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल का? कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे पगार थकवणाऱ्या ठेकेदारावर रेल्वे काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.