मुंबई : मुंबईतील लोअर परेलमधील वाहतुकीसाठी बंद केलेला पूल कोणी बांधायचा याबाबतचा तिढा अखेर सुटला आहे. मुंबई महापालिका हद्दीतील पूल महापालिका बांधणार आणि रेल्वेच्या हद्दीतील पूल रेल्वे बांधणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. या पुलाचं डिझाईन रेल्वे करणार असल्याचंही बैठकीत निश्चित झालं.

मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर लोअर परेल रेल्वे ब्रिज हा धोकादायक असून तो बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) 24 जुलैपासून हा वाहनांना वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता. दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ब्रिज बंद राहणार आहे.

परंतु तीन दिवसांनी हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला. पूल बंद केल्याने स्थानिक नागरिकांनी मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याची ओरड केली होती. यानंतर महापालिका, रेल्वे, आयआयटी आणि स्थानिक प्रतिनिधींनी पुन्हा या ब्रिजची पाहणी केली. त्यानंतर केवळ पादचाऱ्यांसाठी हा ब्रिज पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र पूल बंद करुन महिना उलटला तरी पुलाचं काम काही सुरु झालं नव्हतं. पूल बंद असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर काम सुरु करुन पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्याची मागणी नागरिक करत होते. अखेर आज यासंदर्भात मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये बैठक झाली आणि पुलाच्या बांधकामावर तोडगा निघाला.