मुंबई : प्रजा फाऊंडेशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मुंबईतील आमदारांच्या कामगिरीच्या अहवालात घाटकोपर पश्चिममधील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांना शेवटचं 32 वं स्थान देण्यात आलं आहे. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची खिल्ली उडवत अभिनंदन करणारे फ्लेक्स घाटकोपरच्या चौकाचौकात तसंच त्यांच्या घरासमोर लावले आहेत.


आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही या फ्लेक्समध्ये संदर्भ देण्यात आला आहे. विभागात विकास कामं होत नाही, असं प्रजा फाउंडेशनच्या  अहवालातून समोर आलं असून, राम कदम यांचं याकडे लक्ष वेधण्यासाठी फ्लेक्स लावल्याचं मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी सांगितलं.



प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
प्रजा फाऊंडेशनने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील आमदाराचं रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केलं. 2016 ते 2017 दरम्यान चार अधिवेशनातली आमदारांच्या कामगिरीची नोंद प्रजा फाऊंडेशनने घेतली आहे. या अहवालानुसार, काँग्रसचे मुंबईतील आमदार अमिन पटेल यांचा पहिला क्रमांक लागतो तर भाजपचे आमदार राम कदम 32व्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहेत.

मुंबईतील 24 हजार 290 लोकांचं सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हंसा रिसर्चकडून हा सर्व्हे करण्यात येतो. 2016 ते 2017 दरम्यानच्या चार अधिवेशानात राम कदम यांची उपस्थिती सगळ्यात कमी म्हणजे 47 टक्के असून त्यांनी एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही.