मुंबई: 'किरीट सोमय्यांना उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची एवढी काळजी असेल तर माझं त्यांना आव्हान आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांची संपत्ती त्यांनी जाहीर करावी.' अशा शब्दात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी किरीट सोमय्यांवर पलटवार केला.

'मी माझी संपत्ती वेबसाईटवर जाहीर केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी', असं आव्हान सोमय्यांनी दिलं होतं. तसेच काही कंपन्यांशी उद्धव ठाकरेंचे लागेबांधे असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे. त्याला राहुल शेवाळेंनी उत्तर दिलं आहे.

'किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. माझं तर त्यांना आव्हान आहे की, त्यांनी सर्वात आधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची संपत्ती जाहीर करावी. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे किरीट सोमय्यांना उद्धव ठाकरेंची संपत्ती जाणून घेण्याचा अधिकार दिलाच कोणी? केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे. त्यामुळे यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना योग्य ती माहिती मिळू शकते, का सरकारी यंत्रणा निष्क्रिय आहेत?, किरीट सोमय्या हे स्वत: भ्रष्ट आहेत. त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याचा काहीही अधिकार नाही.' अशा शब्दात राहुल शेवाळेंनी किरीट सोमय्यांचा आरोपांना उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे, सोमय्यांचा आरोप

किरीट सोमय्या यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर केली असून या कंपन्यांशी असलेले लागेबांधे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. सात कंपन्यांपैकी 2 कंपन्यांवर सेबीने बंदी घातली असून 2 कंपन्यांमध्ये छगन भुजबऴांनी पैसे गुंतवले असल्याची माहिती सोमय्यांनी दिली. शिवाय पंतप्रधान मोदींनी बोगस कंपन्यांविरोधात टास्क फार्स नेमला म्हणून उद्धव ठाकरे मोदींवर टीका करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांनी दावा केलेल्या सात कंपन्या :

जगमंद्री फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड

किम इलेक्ट्रॉनिक्स

जेपीके ट्रेडिंग

लेक्सस इंफोटेक

रिगलगोल्ड ट्रेंडिंग को-ऑपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड

व्हॅनगार्ड ज्वेल्स लि.

यश ज्वेल्स लि.

संंबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे, सोमय्यांचा आरोप

उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या