नवी मुंबई : नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. कैद्यांचं थोडं मनोरंजन व्हावं व त्यांची मानसिक तणावातून मुक्तता व्हावी या उद्देशाने तळोजा कारागृहात रेडिओची सुरुवात करण्यात आली आहे.


तळोजा मध्यवर्ती कारागृहात साडे तीन हजाराहून अधिक आरोपी शिक्षा भोगत आहेत. यातील अनेक कैद्यांचा कारागृहातील कालावधी हा अनिश्चित असतो. तर अनेक कैद्यांना आपल्या प्रकरणांसंबंधित मानसिक तणाव असतो. कैद्यांची याच मानसिक तणावातून मुक्तता व्हावी व त्यांना स्वयंप्रेरणा मिळावी या उद्देशाने तळोजा कारागृह क्षेत्रात रोज दुपारी 12 ते 1 दरम्यान रेडिओ चालविण्यात येत आहे.


तळोजा कारागृहातील तीन कैद्यांमार्फत हा रेडिओचा उपक्रम चालविण्यात येतो. ज्यामध्ये एक रेडिओ जॉकी, एक लेखक व एक ऑपरेटर म्हणून काम करत आहे. कैद्यांना प्रेरणा मिळेल अशी थीम राबवून त्यानुसार हिंदी व मराठीमधील सदाबहार गाणी वाजवण्यात येतात.


या माध्यमातून आपले राष्ट्रीय सण, थोर महापुरुष यांची जयंती व पुण्यतिथी देखील साजरे करुन या महापुरुषांचा जीवनप्रवास कैद्यांपर्यंत पोहोचवण्यात येतो. जेणेकरुन यातून कैद्यांना भावी आयुष्यात प्रेरणा मिळेल, अशी माहिती तळोजा कारागृहाच्या अधीक्षकांनी दिली.