मुंबई : राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. यावेळी स्पष्टीकरण देताना एका मंत्र्याच्या शहरात ‘मंडी टोळी’ नावाची कुख्यात टोळी कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट विखे पाटलांनी केला आहे.


या टोळीकडे 4 हजार शस्त्रं असून जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करते अशी माहितीही त्यांनी विधानसभेत दिली. तसेच या टोळीला राज्यातील मंत्र्यांचाच पाठिंबा असल्याचं विखे-पाटील यांनी म्हंटलं आहे.

या प्रकरणावरुन विखे-पाटलांनी मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धरलं. ‘या टोळीला राज्यातील एका मंत्र्याचाच खुला पाठिंबा आहे की नाही, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गुप्तचर विभागाकडून घ्यावी.’ असे ते यावेळी म्हणाले.

‘राज्यातील मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत, गुन्हेगारी टोळ्यांना पाठीशी घालत आहेत. तरीही मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष का करतात?’ असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केला.