मुंबई : योगगुरु रामदेव बाबा हे राष्ट्रीय पुरुष आहेत, अशी मुक्ताफळं भाजप नेते, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी उधळली आहेत. काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी विधानपरिषदेत रामदेव बाबांवर टीका केल्यामुळे गिरीश बापट यांचा तिळपापड झाला.


विधानपरिषदेमध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार संजय दत्त यांनी रामदेव बाबा यांची 'पतंजली'ची उत्पादने विकण्याच्या शासन निर्णयाचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा मांडताना दत्त यांनी रामदेव बाबांवर टीका करायला सुरुवात केली.

ही टीका सहन न झाल्यामुळे गिरीश बापट बोलायला उभे राहिले आणि त्यांनी रामदेव बाबा यांच्या कर्तृत्वाचा गौरव करायला सुरुवात केली. 'रामदेव बाबा यांनी योग प्रचाराचं मोठं कार्य केलं आहे. त्यांना त्यांच्या उद्योगासाठी मिळालेली जागा ही नियमाने देण्यात आली आहे' असं सांगताना रामदेव बाबा हे राष्ट्रीय पुरुष असल्याचं बापट सभागृहात म्हणाले.

गिरीश बापट यांच्या स्तुतिसुमनांमुळे सभागृहसुद्धा काही वेळ आश्चर्यचकित झालं.