मुंबई : तुम्ही तुमची गाडी नोंदणीकृत शो रुमऐवजी एखादा एजंट, डीलर किंवा एखाद्या व्यक्तीकडून घेतली असेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. कारण, टाटा कंपनीसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिजेक्ट केलेल्या गाड्या, ज्या भंगारात विकल्या जाणार होत्या, अशा गाड्या फसवून लोकांना विकण्यात आल्या आहेत.

स्वस्त किंमतीत गाडी मिळत असल्याचं पाहून अनेकांनी या गाड्या कोणत्याही चौकशीविना खरेदी केल्या. ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून सक्रिय असलेल्या या रॅकेटने आतापर्यंत छोट्या-मोठ्या 500 गाड्या फसवून विकल्या आहेत.

गाडी खरेदी करण्याची प्रक्रिया मोठी असते, त्यामुळे फसवणूक कशी झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या रॅकेटमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणं आणखीच सोपं झालं. आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट कागदपत्र बनवून गाडी रस्त्यावर उतरवली जायची.

पोलिसांनी या प्रकरणी अडीच कोटी रुपये किंमतीच्या 34 छोट्या-मोठ्या गाड्या जप्त केल्या आहेत. शिवाय दोन आरटीओ अधिकारी राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे, बीडमधील आरटीओ एजंट सय्यद अहमद आणि स्क्रॅप डीलर सचिन सोनवणे यांना अटक केली आहे.