मुंबई : सतत विविध कारणांमुळे चर्चेत असलेलं मुंबई विद्यापीठ आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएच्या मराठी विषय पेपर क्रमांक सहा अभ्यासक्रमात 'पाणी कसं असतं' ही कविता वादाचा मुद्दा बनली आहे.

ही कविता कवी दिनकर मनवर यांच्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात' कविता संग्रहातील आहे. या कवितेच्या ओळीत पाण्याला वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची अश्लील उपमा कवीने दिली असल्याचा आरोप आदिवासी समाज आणि काही विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

आदिवासी विद्यार्थी संघटना, युवा सेना यांनी या कवितेतील ओळीबद्दल आक्षेप नोंदवला असून ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी अशी मागणी केली आहे.

यासाठी विद्यापीठ कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी अधिष्ठात्यांना अभ्यासक्रम मंडळाची लवकरात लवकर बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून यावर आता काही तरी तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

कवी दिनकर मनवर हे अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. शिवाय त्यांनी या कवितेत व्यापक अर्थ मांडला असल्याचं समजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचं म्हणणं आहे.